पुढील काही दिवसांमध्ये दहावीचा Result लागेल तर काहीच दिवसांपूर्वी १२विचा Result लागला आहे. या पार्श्वभूमीवर काही लिहावेसे वाटले, म्हणून हा थोडा वेगळा विषय मांडत आहे. कोणत्याही परीक्षेचा Result म्हणजे घराघरांमध्ये पालक आणि मुले दोघांसाठी हा परीक्षा झाल्यानंतरच्या परीक्षेचा काळ असतो. वास्तविक परीक्षा देऊन झाल्यानंतर त्या विषयी नंतर फार विचार करण्याची किंवा कसा Result लागला, या विषयी फार विश्लेषण करण्याची गरज नाही; परंतु आपल्याकडे याविषयी काही मनोधारणा फारच खोलवर अशा रुजल्या गेल्यामुळे हा सर्व काळ पालक आणि मुले विविध कारणांनी तणावाला सामोरी जातात.
आता उत्तम अभ्यास करून पेपर चांगला लिहिणे फक्त मुलांच्या हातात आहे. मुलांना अभ्यासासाठी चांगल्या सोयी- सुविधा देणे, उदा. चांगला क्लास वगैरे लावणे पालकांच्या कक्षेमध्ये किंवा नियंत्रणात आहे; परंतु परीक्षेचा निकाल कसा लागेल, हे पालक व मुले दोघांच्याही नियंत्रणाबाहेरील गोष्ट आहे. हे माहीत असूनही पालक स्वतः तणावाला सामोरे जातात व तो तणाव यशस्वी होण्याचा दबाव कळत-नकळत मुलांमध्ये निर्माण करताना दिसतात. म्हणूनच Result ला सामोरे जाण्यासाठी पालक व मुलांसाठी काही टिप्स द्याव्यात म्हणून हा लेखप्रपंच आहे.
 
कोणत्याही परिस्थितीमध्ये मी जर शांत व स्थिर राहू शकलो तर आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूची माणसेही स्थिर राहण्यास मदत होते. आपण तशी ऊर्जा आपल्या व्यक्तिमत्त्वातून परावर्तित करत असतो. त्यामुळे शांत व स्थिर राहावे.
 
Result लागल्यावर आपल्या मुलाला किती मार्क पडतील, याचा साधारण अंदाज प्रत्येक पालक व पाल्याला असतो. त्यामुळे कोणत्या शाखेची निवड आपण करणार आहोत, याचे पर्याय अगोदरच थोडी माहिती मिळवून किंवा करियर कौन्सेलर्सची मदत घेऊन आपण निवडू शकतो. याची पूर्वतयारी Result लागण्याअगोदरच करणे आवश्यक आहे. त्यासाठी तीन ते पाच पर्यायांचा विचार व त्या संबंधित माहिती उदा. कॉलेज कुठे आहे, गेल्या वर्षीचे कट ऑफ किती) व त्याच जोडीने इतर पर्यायांविषयीची पूर्ण माहिती मुलांनी आणि पालकांनी मिळवून ठेवावी. त्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल.
 
बरेच पालक आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करताना दिसतात. आपल्या स्वत: लाही आपली तुलना कोणाशी केलेली आवडत नाही. त्यामुळे आपल्या पाल्याची व त्याच्या मार्कांची तुलना इतर मुलांच्या मार्कांशी करणे पालकांनी टाळावे. प्रत्येकजण सर्वार्थाने एकमेकाद्वितीय असाच असतो, हे लक्षात ठेवावे.
 
आपल्या पाल्याची योग्यता किंवा लायकी त्याच्या मार्कांवर अवलंबून ठेवू नये. परीक्षेतील मार्क हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा आहे. करियर मध्ये किंवा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्कांपेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वातील इतर गुणविशेषच जास्त कामास येताना दिसतात. उदा. दहावी- बारावी बोर्डात आलेल्या एका मुलाला पुढे कंपनीत ताण- तणाव सहन न करता आल्यामुळे नोकरी गमवावी लागली होती, माझ्याकडेच येणाऱ्या एका पेशंट चे हे उदाहरण आहे. त्यामुळे त्याला डिप्रेशनलाही सामोरे जावे लागले होते.
 
पंधरा ते अठरा वयोगटातील मुले-मुली अनेक मनोशारीरिक बदलांना सामोरी जात असतात. या सर्व बदलांना सामोरे जाणे व स्वतः ला कुटुंबात, मित्रांमध्ये व समाजात सिद्ध करण्याचे मोठे आव्हान या टिनएजर्सना पेलावे लागते. त्यामुळे पालकांनी या सर्व गोष्टींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करावा व त्यांनंतरच मुलांकडून अपेक्षा ठेवाव्यात. आपण स्वतः या वयोगटात कसे होतो, याचीही आठवण ठेवण्यास हरकत नाही. त्यामुळे मुलांना समजून घेणे सोपे जाईल.
 
मुलांनी आणि पालकांनी एकमेकांशी योग्य संवाद ठेवावा. काही घरांमध्ये, मुलांमध्ये व पालकांमध्ये योग्य संवादाचा अभाव दिसतो. एकमेकांविषयीच्या अपेक्षांवर एकमेकांशी बऱ्याचदा बोललेच जात नाही. त्यामुळे निष्कारण तणाव निर्माण होतो. पालक-मुलांचे नाते नीट राहू शकत नाही. मुलांनीही पालकांच्या अपेक्षांचा आदर करावा. पालक आपल्यासाठी खूप मेहनत घेतात त्यामुळे त्यांना विसंवादाने दुखावण्यापेक्षा आपल्याला काय म्हणायचे आहे, यावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा व्हायला हवी. एकमेकांचे गुण-दोष दाखवण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यायला शिकले पाहिजे.
एकंदरीतच Result ची प्रक्रिया आपल्या आयुष्यात अनिवार्य आहे, हे मनोमन स्वीकारून सर्व प्रक्रियेत पालक व मुलांनी एकमेकांना सहकार्य करावे, एकमेकांचा आदर करावा आणि जे मार्क्स मिळतील, त्याचा आनंदाने स्वीकार करावा. हे मार्क्स म्हणजे जीवनाती सर्वस्व नव्हे, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न होण्याची काळजी घ्यावी. मला खात्री आहे तुमचा भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे.
 
डॉ. मकरंद ठोंबरे.